भंडारा : जिल्ह्यात रेती माफियांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अवैध रेती घेऊन जाणाऱ्या एका ट्रक चालकाने मंडळ अधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार शनिवार (दि.४) सकाळी १० ते ११.३० च्या सुमारास अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत पहेला ते बोरगाव खुर्द मार्गावर घडला.
मंडळ अधिकारी पृथ्वीराज विठ्ठल अहीर (४७) हे त्यांचे सहकारी महसूल सेवक अमित बावनकर यांच्यासह खासगी कारने शासकीय कामासाठी गोलेवाडीकडे जात होते. पहेला-पवनी मुख्य मार्गावर त्यांना एक संशयास्पद ट्रक दिसला. तपासणी केली असता, त्यात कोणत्याही रॉयल्टी किंवा परमिटशिवाय अवैधपणे ८ ब्रास रेती नेण्यात येत असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी ट्रक थांबवून कारवाई सुरू केली असता, तिथे एका कारमधून ट्रक मालक व त्याचे साथीदार पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालत जबरदस्तीने ट्रक भंडारा रोडच्या दिशेने पळवून नेला. जेव्हा अहीर यांनी आपल्या कारने ट्रकचा पाठलाग सुरू केला, तेव्हा ट्रक चालकाने अचानक वाहन मागे (रिव्हर्स) घेऊन अधिकाऱ्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे नुकसान झाले असून अधिकारी थोडक्यात बचावले.
या घटनेनंतर मंडळ अधिकारी पृथ्वीराज अहीर यांनी अड्याळ पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला.