Tiger Attacks Woman Sakoli Umarzari
भंडारा: साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथे वाघाच्या हल्ल्यात मोहफूल संकलन करणाऱ्या शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, शेजारील उमरझरी शेतशिवारात वाघाने एका शेतमजूर महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ माजली आहे. शनिवारी (दि.२८) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत माया रामकृष्ण सोनावणे या गंभीर जखमी झाल्या.
या घटनेनंतर वनविभागाच्या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी जंगल परिसरात जाळपोळ केल्याची घटना घडली आहे.
आज सकाळी १० वाजताच्या सुमारास माया सोनावणे आणि त्यांचे पती रामकृष्ण सोनावणे हे आपल्या शेतात हिरव्या मिरच्या तोडण्याचे काम करत होते. यावेळी शेतालगतच्या जंगलातून अचानक आलेल्या पट्टेदार वाघाने माया यांच्यावर हल्ला केला. वाघाने आपल्या तीक्ष्ण दातांनी माया यांची मान पकडून त्यांना सुमारे १० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. हा थरार पाहून पती रामकृष्ण यांनी आरडाओरडा केली. जवळच काम करणाऱ्या इतर शेतकरी आणि मजुरांनी तातडीने धाव घेत गोंधळ घातल्याने वाघाने माया यांना सोडून जंगलात पळ काढला. यात महिलेच्या गळ्याला गंभीर खोल जखम झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी माया सोनावणे यांना खासगी वाहनाने तातडीने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. कृष्णा मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक आचरेकर, पोलिस कॉन्स्टेबल संदीप बावनकुळे आणि मधुकर शेंडे यांनी रुग्णालयात पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून माजी जि.प. सदस्य माहेश्वरी नेवारे, जि.प. सदस्य अविनाश ब्राह्मणकर, माजी जि.प.सदस्य नेपाल रंगारी यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय यांच्याशी चर्चा करून जखमी महिलेला तातडीने आर्थिक मदत, योग्य नुकसान भरपाई आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मोफत देण्याची मागणी केली.
वाघ दिसताच डार्ट मारण्याचे आदेश
वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर अस्थाई टॉवर उभारण्यात येत असून पिंजरा लावण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. वनविभागाची रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी पोहोचत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या वाघाला दिसताक्षणी गुंगीचे डार्ट मारण्याचे (ट्रँक्विलाइज) आदेश देण्यात आले आहेत.