Bhandara ZP School Students
भंडारा : विषय शिक्षकांच्या मागणीसाठी साकोली तालुक्यातील सानगडी येथील जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ५० ते ६० विद्यार्थी एसटी बसने जिल्हा परिषद कार्यालयात धडकले. विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच शिक्षण सभापतींच्या कक्षात जाऊन शाळेला आवश्यक विषय शिक्षक तातडीने देण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली.
विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे इतर पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा केली. मात्र, सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले. ‘आम्हाला शिक्षक द्या’, अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली.
दरम्यान, शिक्षक उपलब्ध न झाल्यास विद्यार्थी आणि पालक मिळून शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला. परिस्थिती चिघळल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून सोमवारी शिक्षक उपलब्ध करून देण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ तोंडी आश्वासन न स्वीकारता ‘आम्हाला लेखी द्या’, अशी मागणी केली. यावर प्रशासनाकडून स्पष्ट लेखी आश्वासन मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे आता सोमवारी सानगडी शाळेला विषय शिक्षक मिळतात की विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, याकडे लक्ष लागले आहे.
सानगडी येथील जिल्हा परिषद शाळा आणि विद्यालयात पाचवी ते बारावीपर्यंत सुमारे ११२७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परिसरातील १५ गावांतील विद्यार्थी या विद्यालयावर अवलंबून आहेत. परिसरातील उत्कृष्ट शाळा म्हणून ओळख असलेल्या या विद्यालयाची अध्यापन व्यवस्था शिक्षकांच्या कमतरतेमुळे ढासळत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.