पोलिस अधिकाऱ्यावर अस्वलाचा हल्ला  
भंडारा

Bhandara Bear Attack | पोलिस अधिकाऱ्यावर अस्वलाचा हल्ला : राजेगाव एमआयडीसीमधील घटना

हरवलेल्या मुलाचा शोध घेत असताना पोलिसांच्या पथकावरच अस्वलाचा हल्ला

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: हरविलेल्या ११ वर्षीय मुलाचा शोध घेत असताना लाखनी पोलिसांच्या पथकावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


६ ऑगस्ट रोजी रात्री भाग्यश्री धर्मेंद्र सुखदेवे रा. राजेगाव एमआयडीसी यांनी त्यांचा मुलगा दिव्यांश हा शाळेतून आल्यानंतर सायकलने मित्रासोबत पटाची दाणीवर गेला असल्याची तक्रार दिली. वडील मारतील या भीतीने त्याने सायकल तिथेच फेकून नर्सरीकडे पळ काढला होता. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अचल कपूर यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे, हवालदार अमितेश वडेटवार, वच्छला चाचेरे, पियुष बाच्छल, सचिन बुधे, शुभम फंदे, स्वप्नील कहालकर यांचे पथक शासकीय वाहनासह शोधासाठी रवाना झाले.

गावकऱ्यांच्या मदतीने वेगवेगळी पथके तयार करून गाव, परिसर व जंगलात शोध घेतल्यानंतर दिव्यांश गावाबाहेर सुखरूप मिळून आला. त्याला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, मुलगा सापडल्यानंतर पथक गडेगाव आगार परिसरात असताना पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. तत्काळ पोलिस पथक व गावकऱ्यांनी बागडे यांना ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे रेफर करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT