तस्करांचा पाठलाग करताना पोलिस आणि जनावरांनी भरलेले वाहन उलटले Pudhari Photo
भंडारा

Bhandara Crime News | तस्करांचा पाठलाग करताना पोलिसांच्या वाहनासह जनावरांनी भरलेले वाहन उलटले

पवनी तालुक्यातील घटना: नागभीड पोलिस ठाण्याचे पोलिस जखमी

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पवनी तालुक्यातील निष्टी फाट्याजवळ गुरांनी भरलेल्या वाहनाचा पाठलाग करताना नागभीड पोलिसांचे वाहन आणि जनावरांनी भरलेले बोलेरो पिकअप वाहन उलटले. या अपघातात नागभीड पोलिस ठाण्याचे दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले.

नागभीडचे पोलिस पथक जनावरांनी भरलेल्या बोलेरो पिकअप वाहनाचा पाठलाग करताना पवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आले होते. कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण १४ गुरांना वाचवले. पाठलाग करताना, गुरांनी भरलेल्या वाहनाने मार्ग अडवून कारवाईत अडथळा आणला.

या घटनेनंतर पवनी पोलिसांनी आरोपी विनोद नथू मदनकर (४२), यशकुमार महादेव रामटेके (३५), चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरणा गावातील दिवाकर कुंभारे (४५) आणि पवनीतील ताडेश्वर वॉर्डातील प्रदीप भुरे (३८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोविंदलवार रात्री ड्युटीवर होते. यावेळी पोलिस पथकाने बोलेरो पिकअप वाहनाला थांबविण्याचा इशारा केला. परंतु पोलिसांना पाहून चालक पळून गेला. पोलिसांनी आरोपीच्या वाहनाचा सुरू पाठलाग केला. या दरम्यान, निलज फाट्याजवळ, मारुती वॅगनआर क्रमांक एमएच ४९ बीआर १२६७ च्या चालकाने पोलिसांच्या वाहनासमोर आपली कार आणून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. आरोपी बोलेरो पिकअप वाहनाने पोलिसांना अनेक किलोमीटरपर्यंत चकमा देत राहिले. निष्ठी फाट्याजवळ गोवंश तस्करांनी पोलिसांच्या वाहनाला धडक दिली तेव्हा वाहन उलटले. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक गोविंदलवार आणि चालक किरकोळ जखमी झाले. त्यानंतर बोलेरो वाहनात भरलेल्या १४ गुरांना वाचवण्यात आले. या गुरांना गोशाळेत पाठवण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक येवले करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT