लोकप्रतिनिधिंनीच लाखनी पंचायत समितीला ठोकले कुलूप file photo
भंडारा

Bhandara News | लोकप्रतिनिधिंनीच लाखनी पंचायत समितीला ठोकले कुलूप

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : लाखनी तालुक्यातील ७१ ग्रामपंचायती अंतर्गत धूर फवारणी करण्यात यावी, याबाबत दोन महिण्यांपूर्वी लाखनी पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी नेताजी धारगावे यांना मासिक सभेत सांगण्यात आले होते. या विषयान्वये पंचायत समितीच्या मासिक सभेत शुक्रवारी (दि. २०) पं.स. सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र, धारगावे यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने दुपारी दोन वाजता पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्यांनी मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला.

लाखनी पंचायत समितीची शुक्रवारी (दि.२०) मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या मासिक सभेत सभापती, उपसभापती, सदस्य व खंड विकास अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. पं. स. सदस्य रविंद्र खोब्रागडे यांनी तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गावागावात धूर फवारणी का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित केला. यावर खंड विकास अधिकारी धारगावे यांनी प्रत्येक ग्रामपंचायतींना पत्र दिले असल्याचे सांगितले. मात्र, खोब्रागडे यांनी ग्रामपंचायतींना दिलेले पत्र सभागृहात सादर करा, असे खंड विकास अधिकारी यांना म्हटले असता खंड विकास अधिकारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सभागृहातून पलायन केले.

मासिक सभेत लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही, म्हणून पंचायत समिती सदस्यांना सभागृहातच सोडून खंड विकास अधिकारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सभागृह सोडणे म्हणजे हा तालुक्यातील जनतेचा अपमान आहे. असे म्हणत लाखनी पंचायत समितीच्या सभापती प्रणाली सार्वे, उपसभापती गिरीश बावनकुळे यांच्यासह पं. स. सदस्यांनी चक्क पंचायत समितीला कुलूप ठोकले.

२० सप्टेंबर रोजी लाखनी पंचायत समिती येथे नियमाप्रमाणे आमसभा आयोजित करण्यात आली होती. आरोग्य समस्यांच्या अनुषंगाने सदर सदस्यगणांनी चर्चा करण्यात आली. याबाबत तालुक्यातील ग्रामसेवक अधिकाऱ्यांना आदेश दिले गेले. परंतु, सभेदरम्यान पंचायत समिती सदस्य यांनी उद्धट शब्दात वाद घालून सभेबाहेर निघा असे म्हटले. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी सभेच्या बाहेर पडले. यानंतर त्यांनी कुलूप लावले.

- नेताजी धारगावे, गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी

पावसाळ्याचे दिवस असल्याने जुलै महिन्यापासून ग्रामपंचायत स्तरावर डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे धूर फवारणी करण्याच्या सूचना मागील ३ महिन्यांपासून पंचायत समितीच्या मासिक सभेत गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या सर्वत्र आजाराची लागण पसरलेली आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

दादू खोब्रागडे, पंचायत समिती सदस्य, लाखनी

धूर फवारणीबाबत मासिक सभेत पंचायत समिती सदस्यांनी विचारणा केली असता गटविकास अधिकारी समर्पक उत्तर न देता मासिक सभेतून निघून गेले. त्यामुळे सदस्यांनी पंचायत समितीच्या प्रवेश दाराला कुलुप ठोकले. कर्तव्यात कसूर करणाऱ्या गटविकास अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात यावी.

- प्रणाली सार्वे, सभापती, पंचायत समिती लाखनी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT