भंडारा: तुमसर रोड रेल्वे स्थानकावर आज, १८ जून रोजी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात युवकाने धावत्या रेल्वेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना इतवारी-टाटानगर एक्सप्रेसमध्ये घडली असून, युवकाचा मृतदेह खिडकीच्या बाहेरील बाजूस लोंबकळत असल्याचे आढळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास इतवारी-टाटानगर एक्सप्रेस तुमसर रोड रेल्वे स्थानकावर थांबली होती. याच दरम्यान एका डब्याच्या खिडकीला अज्ञात युवकाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत असल्याचे काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. हे दृश्य पाहताच प्रवाशांनी आरडाओरड करून रेल्वे प्रशासनाला सतर्क केले. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह खिडकीबाहेर लोंबकळत असल्याने रेल्वेच्या चाकाखाली येऊन त्या युवकाचे दोन्ही पाय कापले गेल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
पोलिसांकडून शोध सुरू
मृताची ओळख अद्याप अस्पष्ट घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. सदर युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून, तो नेमका कोण होता आणि त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलिस करत आहेत. युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.