भंडारा : भंडारा जिल्ह्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोहाडी तालुक्यातील वरठी येथील रहिवासी असलेली मयुरी हरिश्चंद्र चौधरी या तरुणीचा चेन्नई येथील समुद्रकिनाऱ्यावर बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २२) घडली. सेल्फी घेण्याच्या नादात आलेल्या एका अजस्त्र लाटेने मयुरीसह तीन तरुणांना समुद्रात ओढले, ज्यात मयुरीला आपला जीव गमवावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील १५ तरुणांचा एक गट चेन्नई येथील एका प्रसिद्ध आयटी कंपनीत इंटर्नशिपसाठी गेला होता. शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने हे सर्व तरुण चेन्नई येथील पाँडिचेरी रोडवरील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेले होते. फेसाळणारा समुद्र आणि विलोभनीय वातावरण पाहून सर्व मित्र-मैत्रीण एकत्र मिळून सेल्फी घेत होते.
सेल्फी घेत असताना अचानक समुद्रात १० ते १५ फूट उंचीच्या लाटा उसळल्या. या लाटांचा वेग इतका प्रचंड होता की, लाटेच्या तडाख्यात संपूर्ण समूह ओढला गेला. यातील तीन तरुण समुद्राच्या प्रवाहात वाहून गेले. स्थानिक कांताट्टूर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली असता मयुरी चौधरी हिचा मृतदेह हाती लागला. इतर दोन तरुणांचा शोध अद्याप सुरू असल्याचे समजते.
मयुरीच्या मृत्यूची बातमी धडकताच वरठी येथील तिच्या निवासस्थानी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. आपली मुलगी आयटी क्षेत्रात नाव कमवेल, या आशेने तिला परराज्यात पाठवणाऱ्या पालकांवर आज आभाळ फाटले आहे. मयुरीचे कुटुंबीय तातडीने चेन्नईकडे रवाना झाले.