भंडारा

Bhandara News : वलमाझरी येथे दोन रानगव्यांची शिकार

वनविभागाची कारवाई, आरोपी शेतमालकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : लाखनी तालुक्यातील वलमाझरी येथे शेतपिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने दोन रानगव्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वनविभागाने तातडीने कारवाई करत आरोपी शेतमालकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी (दि.१२) रोजी उमरझरी सहवनक्षेत्रातील वलमाझरी शिवारात दोन रानगवे मृत अवस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय व सहवनक्षेत्र अधिकारी पी.बी. ढोले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खाजगी गट क्रमांक ३८८ आणि ३८६ च्या सीमेवर हे रानगवे मृतावस्थेत आढळले. पशुवैद्यकीय अधिकाºयांमार्फत रानगव्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. तपासादरम्यान, शेतमालक कुमार आनंदराव बन्सोड याने पिकाच्या संरक्षणासाठी शेताभोवती जिवंत विद्युत प्रवाह सोडल्याचे आढळून आले. या तारांच्या संपर्कात आल्यानेच दोन्ही रानगव्यांचा मृत्यू झाला होता.

वनविभागाने आरोपीच्या शेतातून करंट लावण्यासाठी वापरलेले लाकडी खुंटे आणि सेंट्रिंग तार जप्त केली आहे. आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९, ५० आणि ५१ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT