भंडारा : मोहाडी तालुक्यातील देव्हाडा आणि तुमसर तालुक्यातील माडगी गावांदरम्यान वैनगंगा नदीपात्रात शुक्रवारी दुपारी घडलेल्या एका थरारक घटनेत, पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने ट्रॅक्टर अडकून त्याला जलसमाधी मिळाली. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील पुलाच्या कामासाठी नदीपात्रात ठेवलेले जनरेटर बाहेर काढण्यासाठी उतरलेला हा ट्रॅक्टर अचानक वाढलेल्या पाण्यात अडकला होता. सुदैवाने, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे चालकाची दोरीच्या साहाय्याने सुखरूप सुटका करण्यात आली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
देव्हाडा-माडगी परिसरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर मुंबई-हावडा रेल्वे मार्गाचा पूल असून, त्या ठिकाणी रेल्वेच्या कामासाठी यंत्रसामग्री ठेवण्यात आली होती. त्यातील जनरेटर नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी माडगी येथील अमृत बुधे यांचा ट्रॅक्टर भाड्याने घेण्यात आला होता. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास नदीची पाणीपातळी वाढणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जनरेटर बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, त्याच वेळी कवलेवाडा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने काही मिनिटांतच वैनगंगेचा प्रवाह प्रचंड वेगाने वाढला. पाण्याचा वेढा ट्रॅक्टरभोवती पडल्याने चालकाने वाहन बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही अंतरापर्यंत ट्रॅक्टर पुढे सरकला; मात्र पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने वाहन पूर्णपणे अडकले. अखेर ट्रॅक्टर नदीच्या मध्यभागी पाण्यात बुडू लागला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी नदीकाठी धाव घेतली. वाढत्या प्रवाहात अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी दोरीचा वापर करून, स्वतःच्या जिवाची बाजी लावत बचावकार्य केले. अखेर चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, ट्रॅक्टर आणि जनरेटर नदीपात्रातच पाण्याखाली गेले. ही संपूर्ण घटना अनेक नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केली असून, पाण्यात अर्धवट बुडालेला ट्रॅक्टर आणि त्यानंतर तो प्रवाहात वाहून जातानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.
वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रात काम सुरू ठेवणे आणि पाणी सोडण्यापूर्वी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे होते, त्यामुळे या यंत्रणेबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वे प्रकल्पाच्या कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांचे काटेकोर पालन झाले होते का, याची चौकशी करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र काही क्षणांचा विलंब झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.