भंडारा

Bhandara News : लाखनी येथे रात्रीच्या अंधारात सागवानाची तस्करी; वनविभागाची धाडसी कारवाई, ट्रकसह २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय लाखनी अंतर्गत वनविभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून अवैध सागवान लाकडाची तस्करी करणारा ट्रक पकडला आहे. शनिवारी (दि.३) रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास लाखनी येथे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ७ लाख ७८ हजार ६४८ रुपये किमतीचे सागवान आणि २० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण २७ लाख ७८ हजार रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक एम.एच.३५/के-५२२८ ची तपासणी केली असता, वाहतूक परवान्यानुसार (टीपी) त्यात ९ घनमीटर माल असणे अपेक्षित होते. मात्र, मालाची प्रत्यक्ष शहानिशा केली असता तो विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले. या वाहनामध्ये सागवान प्रजातीचे अवैध वनोपज असल्याचे स्पष्ट होताच वनविभागाने ट्रक गडेगाव आगार येथे जमा केला.

रविवारी (दि. ४) रोजी मजुरांच्या आणि हायड्रा मशीनच्या साहाय्याने ट्रकमधील लाकडांची मोजणी व पाहणी करण्यात आली. या तपासणीत एकूण ८३ नग सागवान आढळले. त्यापैकी ४१ नगांवर पासिंग क्रमांक होते, तर ४२ नगांवर कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना किंवा हॅमर निशाण नव्हते. या ८३ नगांचे एकूण मोजमाप १५.१९ घनमीटर भरले असून त्याची बाजारभावानुसार किंमत ७ लाख ७८ हजार ६४८ रुपये निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, पाच नग चाकभाराचे आणि इतर जलाऊ लाकूडही जप्त करण्यात आले आहे. वनविभागाच्या प्राथमिक तपासणीत हा माल शेंडा-कोयलारी येथून नागपूरमधील कापसी येथे नेला जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ट्रकचालक विलास दुर्योधन गिºहेपुंजे (रा. लाखनी) याच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडेगावच्या सरपंचांच्या उपस्थितीत ही जप्तीची प्रक्रिया पार पडली.

सदर कारवाई भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग आणि साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. ए. धनविजय, क्षेत्र सहाय्यक जे. एम. बघेले, बिटरक्षक टी. जी. गायधने, आर. व्ही. लखवाल आणि जी. जी. मेश्राम यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी एन. ए. धनविजय करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT