Bhandara News : पालकमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसैनिक धडकले पोलीस ठाण्यात! 
भंडारा

Bhandara News : पालकमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसैनिक धडकले पोलीस ठाण्यात!

राजेंद्र सपाटे यांच्या मृत्‍यूप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कारवाईची मागणी;

पुढारी वृत्तसेवा

भंडारा :  भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धोप येथील शेतकरी राजेंद्र सपाटे यांनी दोन दिवसांपूर्वी जीवन संपवले होते या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या कथित बेजबाबदार भूमिकेमुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप करत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आंधळगाव पोलीस ठाण्यात धडकले.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र सपाटे हे आपल्या शेतपरिसरातील नहरासंदर्भातील समस्यांमुळे त्रस्त होते. या समस्यांबाबत त्यांनी पालकमंत्र्यांकडे वारंवार विनवण्या केल्या होत्या. आपल्या अडचणी दूर न झाल्यास आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही, असेही त्यांनी सांगितल्याचा दावा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, त्यांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले असते, तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती, अशी भूमिका शिवसेनेने मांडली.

या पार्श्वभूमीवर शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या मृत्‍यूस पालकमंत्र्यांची कथित असंवेदनशीलता व बेजबाबदार वर्तन कारणीभूत असल्याचा आरोप करत, संजय रेहपाडे व इतर पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री पंकज भोयर यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी आंधळगाव पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलीस निरीक्षक नितीन राठोड यांनी तक्रार नोंदविण्यास असमर्थता व्यक्त केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. बराच वेळ चर्चा करूनही तक्रारीवर कारवाई होत नसल्याने शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजेंद्र सपाटे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. तसेच या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका व्यक्त केली.

या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पारधी, मोहाडी तालुकाप्रमुख प्रवीण गायधने, तुमसर तालुकाप्रमुख ईश्वर भोयर, शहरप्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक प्रशांत देशमुख, उपशहरप्रमुख राजेश ठवकर, उपतालुकाप्रमुख गोवर्धन मारवाडे, सत्यनारायण कामथे, शिवराज सुरणकर, निखिल बशीने, राजेश कांबळे, विलास भुरे, यश पारधी, विश्वजीत पांडे, एकांत मोहतुरे, संकेत कोसरे, डेव्हिड पटले, पितांबर खंडाते, कैलास नागदेवे, दीपक पटले, दीपक डोंगरे, अरुण फटिंग, राजेश शेंडे, श्रीकांत सार्वे, दीपक भोयर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT