भंडारा : धानाला प्रतिक्विंटल ३,५०० रुपये हमीभाव, प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस, प्रलंबित बोनसचे तात्काळ वितरण आणि शेतीसाठी २४ तास अखंड वीजपुरवठा, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने सोमवारी साकोली येथे भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. सेंदूरवाफा येथून निघालेल्या या मोर्चात पूर्व विदर्भातील सुमारे ४०० ते ५०० ट्रॅक्टर आणि हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष साई रेड्डी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तेलंगणाच्या धर्तीवर २४ तास वीजपुरवठा करण्याची मागणी केली. "निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच संकटात सापडला असून, सरकारने धानाला योग्य हमीभाव आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे. तेलंगणातील शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज मिळते, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का नाही?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
हा भव्य ट्रॅक्टर मोर्चा अखिल भारतीय कार्यकारिणी अध्यक्ष साई रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मधुकर कापगते, दिनेश कापगते, भंडारा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पांडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष डॉ. मंगल बिसेन, प्रज्वल हातझाडे, जगदीश कापगते, अमोल भाकरे, मोहन लंजे यांच्यासह हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. संत श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान, सेंदूरवाफा ते तहसील कार्यालय, साकोली असा हा मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तिथे जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.
मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आमदार नाना पटोले यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करणे सहज शक्य असतानाही त्यांना या सुविधेपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तेलंगणात शेतकऱ्यांना २४ तास वीज, पिकांना योग्य हमीभाव आणि धान खरेदीनंतर तात्काळ चुकारे (पैसे) देण्याची व्यवस्था आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही न्याय, वेळेवर पैसे आणि वीज मिळालीच पाहिजे, असे पटोले म्हणाले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले आणि शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
छत्तीसगडच्या धर्तीवर धानाला प्रतिक्विंटल ३,५०० रुपये भाव, प्रलंबित बोनसचे तातडीने वितरण, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश, तसेच धान खरेदीनंतर ४८ तासांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात यावेत, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले.