भंडारा

Bhandara News : भंडाऱ्यात ग्रामीण विकास 'व्हेंटिलेटर'वर! दीडशे कोटींचा निधी रखडला; ZP सदस्यांचा उपोषणाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निधीला नियोजन विभागाने 'कात्री' लावल्याने खळबळ माजली आहे. सुमारे दीडशे कोटी रुपयांचा विकासनिधी अद्यापही जिल्हा नियोजन समितीकडे पडून असल्याने जिल्ह्यातील रस्ते, आरोग्य आणि पाणीपुरवठ्याची कामे ठप्प झाली असा आरोप करत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, २२ फेब्रुवारीपर्यंत निधी न मिळाल्यास जिल्हा कचेरीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

प्रशासकीय मान्यता असूनही निधी धूळखात

जिल्हा परिषदेने आपल्या १२ ते १३ विभागांतर्गत विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करून त्यांना रीतसर प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. नियमानुसार, नियोजन विभागाला निधी प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या आत तो संबंधित यंत्रणेला वाटप करणे बंधनकारक असते. मात्र, तीन ते चार महिने उलटूनही हा निधी जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे नियोजन विभागाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दीडशे कोटींचा पेच

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा निधी शासनस्तरावरून नियोजन विभागाला प्राप्त झाला आहे. परंतु, हा निधी जिल्हा परिषदेला न मिळाल्याने सन २०२४-२५ मध्ये पूर्ण झालेल्या कामांची देयके अद्याप कंत्राटदारांना मिळालेली नाहीत. यामुळे जिल्हा परिषदेसमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला असून ग्रामीण भागातील नवीन कामे सुरू करणे अशक्य झाले आहे, असे सदस्यांचे म्हणणे आहे.

अध्यक्षांसह सदस्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नियोजनाच्या या अडवणुकीमुळे संतापलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर २२ फेब्रुवारीपर्यंत निधी वितरीत झाला नाही, तर लोकप्रतिनिधींना लोकशाही मार्गाने उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल.

‘नियोजन विभागाच्या दिरंगाईमुळे ग्रामीण जनतेचे नुकसान होत आहे. हक्काचा निधी असतानाही तो अडवून ठेवणे चुकीचे आहे. २२ फेब्रुवारी ही आमची शेवटची मुदत असेल.’
कविता उईके, अध्यक्ष, जिल्हा परिषद भंडारा.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर, आरोग्य सभापती आनंद मलेवार, महिला व बालकल्याण सभापती शीतल राऊत, भाजप गटनेते विनोद बांते, जि.प. सदस्य प्रेम वनवे, देवा इलमे, यशवंत सोनकुसरे, महादेव पचघरे, गायत्री वाघमारे, प्रतीक उईके, संदीप टाले, संगीता नवखरे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT