भंडारा

Bhandara News : मुलाच्या निधनाचा धक्का असह्य; आईनेही सोडले प्राण; खैरना गावात मायलेकावर एकाच वेळी अंत्यसंस्कार

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : लाखांदूर तालुक्यातील खैरना गावात एका अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावाला शोकसागरात लोटले आहे. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे अवघ्या काही तासांच्या अंतरात आईनेही प्राण सोडल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खैरना येथील रहिवासी हिरालाल विठोबा पचारे (वय ६०) यांना २४ मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास तीव्र हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी हलवण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. हिरालाल यांच्या निधनाची बातमी गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.

दरम्यान, हिरालाल यांच्या ८० वर्षीय आई शारजा विठोबा पचारे या काही दिवसांपासून आपल्या मुलीकडे गेल्या होत्या. मुलाच्या निधनाची दुःखद वार्ता मिळताच त्या तातडीने खैरना गावी परतल्या. घरी पोहोचल्यानंतर आपल्या मुलाचा मृतदेह पाहून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. मुलाच्या पार्थिवाजवळ बसून त्या आक्रोश करत असतानाच अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि काही वेळातच त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.

गावात शोककळा

एकाच घरात माय-लेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गावातील ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत मायलेकाच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण खैरना गाव शोकाकुल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT