भंडारा- गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा, उमरझरी आणि आमगाव खुर्द परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आणि नागरिकांच्या मनात धडकी भरवणाऱ्या टी-२७ या जखमी नरभक्षक वाघिणीला अखेर रविवारी सकाळी उमरझरी जंगल परिसरातून वनविभागाने जेरबंद केले आहे.
या वाघिणीला पकडल्याने अनेक दिवसांपासून भीती व दहशतीच्या छायेखाली वावरणाºया ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत येणाºया पिटेझरी वनपरिक्षेत्रात या वाघिणीने मानवी वस्तीत प्रचंड धुमाकूळ घातला होता. १९ मार्च रोजी वसंत मेश्राम यांच्यावरील हल्ल्यापासून सुरू झालेली ही दहशत दिवसागणिक वाढत गेली. २८ मार्च रोजी माया सोनवणे, तर १ एप्रिल रोजी छाया मुंगमोडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतरही २४ जून रोजी आमगाव येथील हरिश्चंद्र मडावी यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे या वाघिणीचा धोका अधिकच गडद झाला होता. या वाघिणीने आतापर्यंत दोन जणांचा बळी घेतला असून दोघे जखमी झाले होते. पिटेझरीच्या कक्ष क्रमांक १४३ मध्ये आमिष आणि मचान तयार करून वाघिणीला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु तब्बल तीन महिने गुंगारा देत वाघिणीने वनविभागाला जेरीस आणले होते. जखमी अवस्थेतील ही वाघीण अत्यंत सावधपणे हालचाली करत असल्याने ती पकडण्यास विलंब होत होता.
वनविभागाला आणले जेरीस
मार्च महिन्यातच दोघांचा बळी गेल्यानंतर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने कंबर कसली होती. या शोधमोहिमेत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, गोंदिया व भंडारा वनविभागाची रॅपिड रिस्पॉन्स टीम, शंभरहून अधिक वनकर्मचारी, चार शार्पशूटर आणि संरक्षक दलाचे जवान चोवीस तास तैनात होते. वाघिणीचा मागोवा घेण्यासाठी पन्नासहून अधिक कॅमेरा ट्रॅप, दहा लाईव्ह कॅमेरे आणि चार थर्मल ड्रोनचा वापर करण्यात आला.
शिकारीनंतर शेतात सुस्तावली आणि जाळ्यात अडकली
रविवारी सकाळी उमरझरी परिसरातील उसाच्या शेतात एका शेळीची शिकार केल्यानंतर वाघीण त्या परिसरात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, गोंदिया व भंडारा वनविभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीम तसेच एफडीसीएमच्या वनकर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या राबविलेल्या मोहिमेत तिला यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले. सध्या तिची वैद्यकीय तपासणी आणि पुढील पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक सुहास कांबळे यांनी दिली. गेल्या चार महिन्यांपासून ग्रामस्थांची झोप उडविणारी टी-२७ अखेर जेरबंद झाल्याने साकोली तालुक्यासह संपूर्ण परिसराने सुटकेचा श्वास घेतला आहे.
शेतकऱ्यांनी घेतला सुटकेचा नि:श्वास
वाघिणीच्या दहशतीमुळे परिसरातील रब्बी हंगामाअखेर शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली होती. मजूर आणि महिला शेतात जाण्यास धजावत नव्हते, ज्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. २४ जून रोजी पुन्हा सक्रिय झालेल्या वाघिणीने हल्ला करून शेतकऱ्याला जखमी केले. त्यामुळे वनविभागाने ही मोहीम पुन्हा तीव्र करत अखेर फत्ते केली. आता वाघीण जेरबंद झाल्याने शेतीकामे पुन्हा पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.