File Photo
भंडारा

Bhandara Farmers Death : शेतात काम करताना अंगावर कोसळली वीज; तुमसर-पवनी तालुक्यात २ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी काही तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान विविध ठिकाणी वीज कोसळल्याच्या दुर्घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. जिल्ह्यातील पवनी आणि तुमसर तालुक्यात वीज अंगावर पडल्याने दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनांमुळे संबंधित गावांवर शोककळा पसरली आहे.

श्रीकांत दिगंबर घावळे (वय ३९, रा. ब्रह्मी) व शरद दवडू बुधे (वय ४५, रा. ढोरवाडा) अशी मृतांची नावे आहेत. तर महेश पांडुरंग फेंडर (वय ३५, रा. मांडणगाव) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घराकडे परतताना काळाचा घाला

पवनी तालुक्यातील ब्रह्मी येथील रहिवासी श्रीकांत घावळे हे शेतातील कामे आटोपून शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घराकडे परतत होते. यावेळी नवेगाव शिवारात अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. हा आघात इतका तीव्र होता की, श्रीकांत यांचा जागीच मृत्यू झाला.

शेतात काम करत असतानाच वज्राघात

दुसरी दुर्घटना तुमसर तालुक्यात घडली. ढोरवाडा (चारगाव) शिवारातील शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमीन सपाटीकरणाचे काम सुरू असताना, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक वीज कोसळली. या घटनेत शरद बुधे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचे मेव्हणे (साळा) महेश फेंडर हे विजेच्या तीव्र धक्क्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

एकीकडे यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत असताना, दुसरीकडे ऐन शेतीच्या हंगामाच्या तोंडावर दोन कुटुंबांनी आपले करते पुरुष गमावले आहेत. या वज्राघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत शरद बुधे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या दोन्ही दुर्दैवी घटनांबद्दल परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना पाऊस किंवा विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात किंवा उघड्यावर न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. या दोन्ही घटनांची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT