भंडाऱ्यात खराब हवामानामुळे शेतात उतरले हेलिकॉप्टर 
भंडारा

Bhandara News | भंडाऱ्यात खराब हवामानामुळे शेतात उतरले हेलिकॉप्टर : मोहगाव करडी परिसरातील नागरिकांची काही काळ धावपळ

नागरिकांमध्ये काही काळ संभ्रम आणि कुतूहल! दुपारी सिग्नल मिळाल्यानंतर पुन्हा घेतले उड्डाण

पुढारी वृत्तसेवा

भंडारा :  आकाशातून येणारा हेलिकॉप्टरचा प्रचंड आवाज आणि त्यानंतर शेतशिवारात झालेले अचानक लँडिंग यामुळे मोहगाव करडी परिसरातील नागरिकांची काही काळ धावपळ उडाली. नागपूरहून रायपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरला खराब हवामानामुळे पुढील मार्गावरील सिग्नल मिळत नव्हता. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत सुरक्षित जागेचा शोध घेत मोहगाव येथील शेतशिवारात हे हेलिकॉप्टर उतरविले.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आणि घटनास्थळी गर्दी केली. मात्र, पोलिसांच्या चौकशीत हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने सर्व ९ जणांनी सुटकेचा श्वास सोडला.

मोहगाव करडी येथील धनराज बांडेबुचे यांच्या शेताजवळ तसेच करडी-तुमसर मार्गालगत तलावाच्या परिसरात मोकळी जागा आहे. याच भागात सकाळी ११ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास हे हेलिकॉप्टर उतरले. नागपूरहून रायपूरच्या दिशेने जाणारे त्रिवेणी कंपनीचे ४०७ जीएक्स हेलिकॉप्टर प्रतिकूल हवामानातून मार्गक्रमण करीत होते. वातावरणातील बिघाडामुळे पुढील दिशेचे सिग्नल मिळत नसल्याने चालक अनुराग यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सुरक्षित जागेचा शोध घेतला. त्यानंतर हे हेलिकॉप्टर करडी आणि परिसरातील गावांच्या अगदी जवळून कमी उंचीवरून जाताना नागरिकांच्या नजरेस पडले.

हेलिकॉप्टर नेहमीपेक्षा अत्यंत कमी उंचीवरून जात असल्याचे पाहून नागरिकांमध्ये कुतूहल आणि भीती निर्माण झाली. काही क्षणांतच ते मोहगाव परिसरातील शेतशिवारात उतरल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हेलिकॉप्टर नेमके का उतरले, त्यात काही बिघाड झाला आहे का किंवा काही दुर्घटना घडली आहे का, अशा विविध शंकांमुळे परिसरातील नागरिकांची चिंता वाढली. पाहता-पाहता तिथे नागरिकांची मोठी गर्दी जमली. या घटनेची माहिती मिळताच करडी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक फरताडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हेलिकॉप्टरजवळ जाऊन चालक अनुराग यांच्याशी सविस्तर चर्चा केली. खराब हवामान आणि सिग्नल न मिळाल्यामुळे सुरक्षिततेसाठी हेलिकॉप्टर खाली उतरवल्याचे चालकाने स्पष्ट केले.

सिग्नल मिळताच पुन्हा केले उड्डाण

काही काळ मोहगाव परिसरात सुरक्षितपणे थांबल्यानंतर हवामान आणि मार्गावरील परिस्थिती अनुकूल झाली. त्यानंतर दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने मोहगाव येथून पुन्हा यशस्वी उड्डाण केले आणि रायपूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. अलीकडच्या काळात हेलिकॉप्टर दुर्घटनांच्या घटना चर्चेत असताना मोहगाव परिसरातील या घटनेने काही वेळ चिंता वाढवली होती. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संभाव्य धोका टळला असून, या घटनेमुळे वैमानिकाच्या समयसूचकतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT