भंडारा: ज्या घरात अवघ्या चार दिवसांनंतर सनई-चौघडे वाजणार होते, अक्षता पडणार होत्या, त्याच घरातून आज तरुणाची अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झालेली असताना, लाखांदूर तालुक्यातील परसोडी/पाऊळदौना येथील राजेश अविनाश भेंडारकर (२६) या तरुणाने शेताच्या बांधावर गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१२ मार्च) पहाटे घडली.
राजेशचे लग्न येत्या १६ मार्च रोजी ठरले होते. घरात पाहुण्यांची ये-जा सुरू झाली होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. गुरुवारी पहाटे ४ ते ५ वाजताच्या दरम्यान राजेशने घराशेजारील शेताच्या बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून जीवनयात्रा संपविली.
नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजताच्या सुमारास परिसरातील एक महिला घराजवळील केरकचरा फेकण्यासाठी बाहेर आली. तिची नजर शेतातील झाडाकडे गेली असता, तिला राजेश फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसला. महिला हादरून गेली आणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
राजेश हा चंद्रपूर जिल्ह्यातील एका सिमेंट कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. राजेशने लग्नापूर्वीच हे टोकाचे पाऊल का उचलले? लग्नाबद्दल काही अडचण होती की कामाच्या ठिकाणी काही मानसिक ताण होता? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याने गूढ अधिक वाढले आहे.