Pudhari
भंडारा

Bhandara News : शेतात मोटार सुरू करताना काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने मांडेसरच्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथे शेतातील मोटारपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा तीव्र धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. लखपती बाबुराव गराडे (वय ५०, रा. मांडेसर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे मांडेसर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शवविच्छेदनात झालेल्या दिरंगाईमुळे संतप्त नागरिकांनी रुग्णालयात तीव्र रोष व्यक्त केला.

लखपती गराडे हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतावर गेले होते. शेतातील मोटारपंप चालू करण्यासाठी गेले असता, वीजपेटीजवळ (स्टार्टर/डीपी) अचानक वीजप्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार शॉक लागला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर ग्रामस्थांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी (उत्तरीय तपासणी) मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. मात्र, सकाळी ११ वाजताच मृतदेह रुग्णालयात आणलेला असतानाही तेथील प्रशासनाने दुपारी ४:३० वाजेपर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली.

मृत लखपती गराडे यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे गराडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT