Bhandara News | बैलांनी फरफटत नेल्याने शेतकऱ्याचा मृत्‍यू : शेतात चिखलणी करताना दुर्घटना  
भंडारा

Bhandara News | बैलांनी फरफटत नेल्याने शेतकऱ्याचा मृत्‍यू : शेतात चिखलणी करताना दुर्घटना

लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे उन्हाळी धान पिकाच्या रोवणीसाठी सुरु होती मशागत

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे उन्हाळी धान पिकाच्या रोवणीसाठी शेत तयार करत असताना एका शेतकऱ्याचा चिखलात दबून आणि बैलांनी फरफटत नेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आज शुक्रवारी (दि. १३) रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. मधुकर नामदेव राऊत (४५) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

मधुकर राऊत आपल्या एक एकर शेतात उन्हाळी धानाच्या रोवणीसाठी चिखलणी करत होते. लाकडी फळीवर उभे राहून बैलजोडीच्या सहाय्याने ते शेत सपाटीकरणाचे काम करत होते. दरम्यान, अचानक बैल उधळल्याने जोरात धावू लागले. यामुळे फळीवर उभे असलेल्या मधुकर यांचे संतुलन बिघडले आणि ते थेट चिखलात कोसळले. दुर्दैवाने बैलांचा वेग कमी न झाल्याने ते फळीसह चिखलात बराच दूरपर्यंत फरफटत गेले.

हा थरार पाहून शेजारच्या शेतात काम करणाऱ्या लोंकांनी तातडीने धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत मधुकर यांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT