भंडारा : तुमसर तालुक्यातील रोंघा येथे ३१ मार्चपासून बेपत्ता असलेल्या दोन बालकांचे मृतदेह बुधवारी (दि. १) सकाळी गावाजवळील एका पाण्याच्या डबक्यात आढळून आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रपाल रुपचंद कुंभरे (वय ७) आणि सार्थक संजय उईके (६) हे दोन्ही बालक मंगळवार (३१ मार्च) सायंकाळपासून बेपत्ता होते. मुले घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही सुगावा लागला नव्हता. रात्रभर शोध घेऊनही मुले न मिळाल्याने गावात चिंतेचे वातावरण होते.
त्यांचा शोध सुरु असतानाच बुधवारी (१ एप्रिल) सकाळी १० वाजेच्या सुमारास गावाजवळील एका पाण्याच्या डबक्यात या दोन्ही चिमुरड्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. मुलांचा शोध घेणाऱ्या नागरिकांना हे मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ कुटुंबियांना माहिती दिली. एकाच वेळी दोन बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
खेळता खेळता या बालकांचा पाय घसरून डबक्यात पडल्याने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे कुंभरे आणि उईके या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन निष्पाप बालकांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने रोंघा गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणेला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.