भंडारा- : भंडारा-तुमसर महामार्गावरील खरबी शेतशिवारात रविवारी (दि.४) रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने काळवीट गंभीर जखमी होवून उपचारासाठी नेताना मृत पावला.
या परिसरात हरणांचे मोठे कळप वास्तव्यास असून, महामार्ग ओलांडताना होणाºया अपघातांमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यापूवीर्ही याच ठिकाणी अनेक हरणांना आपला जीव गमवावा लागला असून, प्रशासकीय उदासीनतेमुळे वन्यप्राण्यांचा हा मृत्यूचा सापळा कायम आहे. रविवारी सकाळी खरबी शिवारातील जंगलातून एक काळवीट रस्ता ओलांडत असताना तुमसरकडे जाणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत काळविटाच्या पायाला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने ते रस्त्याच्या कडेला कोसळले. या घटनेची माहिती एका वाहनचालकाने तत्काळ वन विभागाला फोनवरून दिली.
घटनेची गांभीर्य ओळखून मोहाडी पोलिस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे कर्मचारी येईपर्यंत पोलिसांनी जखमी काळविटाची काळजी घेतली आणि पुढील उपचारासाठी त्याला पोलिस गाडीतूनच तुमसर येथे हलविण्यात आले. यावेळी वन विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.