भंडारा : भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. 'पवित्र' पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्याला प्राथमिक विभागातील ३४१ आणि माध्यमिक विभागातील ५३ असे एकूण ३९४ शिक्षक मिळाले आहेत. हे शिक्षक लवकरच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रुजू होणार असल्याने शिक्षकांची भासणारी तीव्र टंचाई मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती नरेश ईश्वरकर यांनी या प्रश्नावर सातत्याने आक्रमक भूमिका घेतली होती. जिल्ह्यातील रिक्त पदांची वस्तुस्थिती त्यांनी वेळोवेळी शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत तात्काळ भरती करण्याची मागणी लावून धरली होती.
या मागणीसाठी जिल्ह्यात भव्य 'जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. शिक्षकांअभावी शैक्षणिक नुकसानीचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामुळे हा लढा केवळ लोकप्रतिनिधी किंवा शिक्षकांपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचाही लढा बनला होता. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनीही संसदेत हा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रीय पातळीवर या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले होते.
नव्याने नियुक्त झालेले ३९४ शिक्षक रुजू झाल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नियमित आणि दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. "हा सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे," अशी प्रतिक्रिया सभापती नरेश ईश्वरकर यांनी दिली. दरम्यान, दरमहा सेवानिवृत्तीमुळे पदे रिक्त होत असल्याने शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे असल्याचेही मत व्यक्त होत आहे.