भंडारा: भंडारा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १५ दिवसांच्या नवजात बाळाचा तब्बल ७० हजार रुपयांमध्ये सौदा करून त्याची अवैधपणे विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महिला व बालविकास विभागाने तातडीने कारवाई करत सात जणांविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची सुरुवात 'चाईल्ड हेल्प लाईन'च्या १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर आलेल्या एका तक्रारीने झाली. एका बाळाची ७० हजार रुपयांमध्ये विक्री झाल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चाईल्ड हेल्प लाईनच्या भंडारा येथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक चौकशी सुरू केली. या चौकशीत एका बाळाला अवैधपणे दत्तक देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी या प्रकरणाची सूत्रे हाती घेत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.
तपासात समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती. साकोली तालुक्यातील एका उपजिल्हा रुग्णालयात एप्रिल २०२४ मध्ये एका बाळाचा जन्म झाला. बाळ अवघे १५ दिवसांचे असताना, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक बनावट 'दत्तकलेख' तयार करून त्याला विकण्यात आले. त्यानंतर, दत्तक घेणाऱ्या पालकांनी भंडारा शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्याचे खोटे दस्तावेज तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी भंडारा नगर परिषदेतून बाळाचे नवीन आणि पूर्णपणे बनावट जन्म प्रमाणपत्रही मिळवले.
कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचा किंवा न्यायालयाच्या आदेशाचा अवलंब न करता, केवळ आपापसात संगनमत करून बाळाला विकल्याप्रकरणी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राज्यपाल हरीचंद रंगारी, सुचिता हरीचंद रंगारी (रा. हसारा, ता. तुमसर), अजित पतीराम टेंभुर्णे, सोनाली अजित टेंभुर्णे, नंदकिशोर मेश्राम, राकेश पतीराम टेंभुर्णे, पुष्पलता दिलीप रामटेके (रा. घानोड, ता. साकोली) या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ही संपूर्ण कारवाई सहायक आयुक्त योगेश जवादे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरुण बांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सानिका वडनेरकर आणि त्यांच्या सदस्यांनीही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.