Koka Wildlife Sanctuary Resort Booking Pudhari
भंडारा

Navegaon Nagzira Tiger Reserve | कोका, नवेगावच्या जंगल सफारीसाठी निवासी कक्षांचे ऑनलाईन आरक्षण सुरू

बांबू हट, वन विश्रामगृह आणि लॉग हटचे आरक्षण सुरू

पुढारी वृत्तसेवा

Koka Wildlife Sanctuary Resort Booking

भंडारा : जंगल सफारीचा आनंद घेताना मुक्कामासाठी निवासाची व्यवस्था करण्याची चिंता आता कमी होणार आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील कोका वन्यजीव अभयारण्य आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलातील निवासी कक्षांचे ऑनलाईन आरक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना जंगलभ्रमंतीसोबत मुक्कामाचेही आगाऊ नियोजन करता येणार असून, निसर्गप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र प्रशासनाने कोका वन्यजीव अभयारण्याच्या चंद्रपूर प्रवेशद्वार परिसरातील पर्यटन संकुलासह नवेगाव राष्ट्रीय उद्यान संकुलातील निवासी कक्ष आॅनलाइन आरक्षणासाठी उपलब्ध करून दिले आहेत. कोका पर्यटन संकुलात बांबू हट आणि वन विश्रामगृहातील कक्षांची सुविधा आहे. बांबू हटमधील काही कक्षांचे भाडे प्रत्येकी १ हजार ८०० रुपये अधिक कर, तर अन्य दोन कक्षांचे भाडे प्रत्येकी १ हजार ५०० रुपये अधिक कर निश्चित करण्यात आले आहे.

नवेगाव राष्ट्रीय उद्यान संकुलातील लॉग हटच्या दोन कक्षांसाठी प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये अधिक कर, तर एका कक्षासाठी ३ हजार रुपये अधिक कर आकारण्यात येणार आहे. पर्यटकांना अधिकृत पोर्टलवर उपलब्धता, दर आणि आरक्षणाच्या अटी तपासून निवासाची नोंदणी करता येईल. त्यामुळे ऐनवेळी मुक्कामाची जागा शोधण्याची धावपळ टाळता येणार आहे.

कोका वन्यजीव अभयारण्यातील चंद्रपूर पर्यटन प्रवेशद्वार कोका संकुलापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे संकुल भंडारा शहरापासून साधारण २० ते २५ किलोमीटर, तर नागपूरपासून सुमारे ८५ ते ९० किलोमीटर अंतरावर आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान संकुलाजवळ बकी, खोली, पितांबरटोला आणि माधवझरी ही प्रवेशद्वारे आहेत. हे संकुल गोंदिया शहरापासून सुमारे ६५ ते ७० किलोमीटर, तर भंडाºयापासून ७० ते ७२ किलोमीटर अंतरावर आहे. या अंतरामुळे भंडारा, नागपूर आणि गोंदिया परिसरातील पर्यटकांना सहलीचे नियोजन करणे सोयीचे ठरणार आहे.

अधिकृत संकेतस्थळावरून करा आरक्षण

कोका आणि नवेगाव पर्यटन संकुलातील निवासाची नोंदणी करण्यासाठी पर्यटकांनी महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत सफारी बुकिंग पोर्टलला भेट द्यावी. आरक्षणापूर्वी उपलब्धता, निवासाचे दर, लागू कर आणि अन्य अटी तपासून बुकिंग करावे, असे आवाहन नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT