NNTR Core Zone Safari Closed
भंडारा : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील जंगल सफारी व पर्यटन संकुल 1 जुलै 2026 पासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पर्यटन गेट व पर्यटन संकुले नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक पियुषा जगताप यांनी दिली.
यापूर्वी वनविभागाने कोअर क्षेत्रातील पर्यटन गेट व पर्यटन संकुल 15 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 16 जून 2026 पासून ऑफलाइन तसेच संकेतस्थळावरील ऑनलाइन आरक्षण सुविधा बंद करण्याचे आदेशही जारी करण्यात आले होते. मात्र, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी सुधारित आदेश जारी करून 15 जूनऐवजी 30 जून 2026 पर्यंत पर्यटन सुरू ठेवण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार कोअर क्षेत्रातील पर्यटन 30 जून 2026 पर्यंत सुरू ठेवण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे संरक्षित क्षेत्रातील पावसाळी हंगामात निसर्ग पर्यटनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार कोअर क्षेत्रातील जंगल सफारी व पर्यटन संकुल 1 जुलै 2026 पासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. तथापि, बफर क्षेत्रातील पर्यटन गेट व पर्यटन संकुल सुरू राहणार असून पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक पियुषा जगताप यांनी केले आहे.