Accident News file photo
भंडारा

Nagpur Raipur Highway Accident | नागपूर-रायपूर महामार्गावर अपघातांची मालिका, तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जण जखमी

वैनगंगा नदी उड्डाणपुलाजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक

पुढारी वृत्तसेवा

Six Injured In Accident Bhandara

भंडारा : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सोमवारी (दि. २) अपघातांची मालिका घडली. वैनगंगा नदी उड्डाणपुलाजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन चौघे गंभीर जखमी झाले. तर गुंथारा फाटा येथे अज्ञात पिकअप वाहनाच्या धडकेत सायकलस्वार जखमी झाला. तसेच आमगाव परिसरात ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. या तिन्ही घटनांमध्ये एकूण सहा जण जखमी झाले.

पहिली घटना वैनगंगा नदी उड्डाणपुलाजवळ घडली. लाखनीकडून भंडाऱ्या कडे येणाऱ्या मोटरसायकलवर प्रणव जितेंद्र बनसोड (वय २०), सरिता अरविंद बागडे (वय ४०) आणि मनस्वी अरविंद बागडे (वय २१, सर्व रा. सावरी) प्रवास करीत होते. यावेळी भंडाऱ्याकडून लाखनीकडे जाणाऱ्या मोटरसायकलने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. दुसऱ्या मोटरसायकलचा चालक दीपक शिवशंकर भेदे (वय २६, रा. टेकेपार) हाही जखमी झाला.

दुसरी घटना गुंथारा फाट्यावर घडली. गौतम कारू अंबादे (वय ५५, रा. वाघबोडी) हे धारगाव येथून सायकलने आपल्या गावी जात असताना रायपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या अज्ञात पिकअप वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या धडकेत गौतम यांच्या पायाला दुखापत झाली.

तिसरी घटना आमगाव-सिंगोरी परिसरात घडली. रवींद्र दिलीप ठवकर (वय ३३, रा. धारगाव) हे ट्रॅक्टरने आमगावकडून सिंगोरीकडे जात असताना अचानक ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर एका घराला जाऊन धडकला. या अपघातात चालक रवींद्र यांच्या पाठीला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. या तिन्ही अपघातांची माहिती मिळताच रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतूरे यांनी जखमींना तातडीने भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT