Nagpur Raipur Highway Accident
भंडारा: भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटून उलटल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह दोन तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजता नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील मुंडीपार सडक येथे घडली. लाखनी पोलिसांनी आरोपी कार चालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
प्रदीप जयेंद्र येलमे (वय २०, रा. मुंडीपार) असे मृताचे नाव आहे. जखमींमध्ये कार चालक अनिकेत मोरेश्वर नंदेश्वर (वय २५, रा. मुंडीपार), लोकेश सुरेश बावणे (वय १६) आणि प्रणय बाबुराव सुरजोशी (वय २१, रा. विर्शी, सितेपार) यांचा समावेश आहे.
मुंडीपार/सिंधी येथील संकेत रामकृष्ण भोयर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अनिकेत मोरेश्वर नंदेश्वर (२५) हा त्याच्या एमएच ३६ एबी १५४७ क्रमांकाच्या इको स्पोर्ट कारने मित्रांसोबत राष्ट्रीय महामार्गावरुन जात होता. मुंडीपार/सडक गावाजवळ त्याचे कारवरील नियंत्रण अचानक सुटले आणि ती उलटली. या भीषण अपघातात प्रदीप जयेंद्र येलमे याचा जागीच मृत्यू झाला. तर अनिकेत नंदेश्वर, लोकेश बावणे आणि प्रणय सुरजोशी गंभीर जखमी झाले.
स्थानिकांनी या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस हवालदार मिलिंद गभने करीत आहेत.