भंडारा : नगर परिषद अध्यक्षपदाची सोडत मुंबईत निघाल्यानंतर नगरसेवकपदांची आरक्षण सोडत बुधवारी (दि. ८) जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांमध्ये काढण्यात आली. या सोडतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांनी सुद्धा कोणत्या प्रभागातून कुणाला उमेदवारी द्यावी, याची चाचपणी सुरू केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच महिलांसाठी असलेली आरक्षणाची सोडत जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली नगरपरिषदेच्या कार्यालयात पार पडली. भंडारा नगरपरिषदेत ३५ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. साकोली नगरपरिषदेत २० नगरसेवक, तुमसर नगरपरिषदेत २५ नगरसेवक तर पवनी नगरपरिषदेत २० निवडून द्यायचे आहेत.
मुंबई येथे निघालेल्या अध्यक्षपदाच्या सोडतीत चारपैकी भंडारा, पवनी आणि साकोली नगरपरिषदांमध्ये अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असून तुमसर नगरपरिषद अध्यक्षपद नामाप्रसाठी राखीव आहे. आज सदस्यांच्या आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आपल्या बाजुने आरक्षण निघाल्याने अनेकांना दिलासा मिळाला तर काहींचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून आले.
काही वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लागणार म्हणून बराच खर्च केला आहे. परंतु, प्रत्येकवेळी निवडणूक लांबणीवर गेली. आता मात्र निवडणुकीची तारीख अंतिम टप्प्यात आली असून उमेदवारांनी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यास सुरूवात केली आहे. दिवाळीच्या तोंडावर नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली आहे.
अध्यक्षांपाठोपाठ सदस्यांचे आरक्षण निघताच विविध राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांची नावे मागविली आहेत. उमेदवारांचा प्रभागात असलेला प्रभाव, संबंध आणि आतापर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा तपासून उमेदवारी दिली जाणार आहे. या निवडणुकीत अध्यक्षांची निवड थेट लोकांमधून होणार असल्याने अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरुनही बराच खल होण्याची शक्यता आहे.
लोकसभा आणि विधानसभेत युती आणि आघाडी करुन लढणारे राजकीय पक्ष नगरपरिषदेची निवडणूक मात्र स्वतंत्र लढणार असल्याची माहिती आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस या घटकपक्षांनी तशी तयारी केली आहे. याशिवाय कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसही स्वतंत्र लढणार असल्याची माहिती आहे.