Ended life Pudhari Photo
भंडारा

चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने अल्पवयीन मुलीने जीवन संपवले

लाखांदूर तालुक्यातील घटना; सामाजिक बदनामीच्या भीतीने संपवले जीवन

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : किराणा दुकानातील २५ हजार रुपयांच्या चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्सान सामाजिक बदनामी सहन न झाल्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून जीवन संपवले. ही घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली/अंतरगाव येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिचोली/अंतरगाव येथील शंभू निमजे (७०) यांचे किराणा दुकान आहे. २७ फेब्रुवारी रोजी निमजे आपल्या घरच्या कामात व्यस्त होते. दरम्यान दुकानातील प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले २५ हजार रुपये चोरीला गेले. यानंतर गावातीलच प्रिया (बदललेले नाव) संशयास्पदरीत्या दुकानाबाहेर पडताना एका स्थानिक महिलेने पाहिले होते.

चोरी केल्यानंतर प्रिया ही कोराडी (नागपूर) येथे आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. तिने चोरलेली रक्कम त्या नातेवाईकाकडे सोपवून ती पुन्हा गावी परतली. दरम्यान, दुकानदार निमजे यांनी लाखांदूर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती. प्रिया गावी परतताच संशयावरून पोलिसांनी तिला आणि तिच्या वडिलांना पोलिस ठाण्यात पाचारण केले. चौकशीदरम्यान तिने चोरी केल्याची कबुली दिली आणि पैसे कोराडी (नागपूर) च्या नातेवाईकाकडे असल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ नातेवाईकाशी संपर्क साधून चोरीची रक्कम हस्तगत केली. प्रिया ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिला योग्य ती समज देऊन पालकांच्या स्वाधीन केले.

उचलले टोकाचे पाऊल
पोलिस ठाण्यातून घरी परतल्यानंतर आपण पकडले गेलो आहोत आणि आता समाजात आपली बदनामी होईल, या विचाराने प्रिया प्रचंड तणावात होती. याच भीतीपोटी तिने घरात असलेले विषारी औषध प्राशन केले. प्रकृती खालावल्याने तिला तातडीने लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान मृत्यू झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT