महिला आणि विद्यार्थिनींनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत महामोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.  
भंडारा

Bhandara Crime | चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात आक्रोश : शेकडो नागरिकांचा मोर्चा, तपासासाठी एसआयटी गठीत!

घटनेचा तीव्रतेने निषेध, गुरुवारी दुपारी घटना आली होती उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: शहरातील आंबेडकर वॉर्डात ३ वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची अत्यंत संतापजनक घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. या अमानुष घटनेनंतर जिल्ह्यात संतापाची लाट पसरली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. शुक्रवारी भंडारा शहरात तीव्र आक्रोश पाहायला मिळाला. विविध सामाजिक संघटना, तरुण, महिला आणि विद्यार्थिनींनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत महामोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

गुरूवारी दि. ६ रोजी सकाळी पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या आईने घराजवळील अंगणवाडीत सोडून त्या स्वत: शिवणकामासाठी गेल्या होत्या. दुपारी १२.३० च्या सुमारास पीडित मुलगी रडत असल्याची माहिती तिच्या भावाने आईला दिली. ही माहिती मिळताच आईने तातडीने अंगणवाडीत धाव घेतली. यावेळी अंगणवाडीच्या बाथरूममधून मुलीचा रडण्याचा आवाज येत होता व दार आतून बंद होते. काही वेळ दार ठोठावल्यानंतर एका अनोळखी इसमाने दार उघडले. त्यावेळी पीडित मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या चेहऱ्यावर नखांचे ओरखडे होते. पीडितेला शारीरिक त्रास होत असल्याने तिच्या आईने तिला तात्काळ भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी तात्काळ धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपी गजाआड, एसआयटी गठीत
आरोपीचे नाव रोहित संजय वासनिक (वय ३०, रा. गौतमबुद्ध वॉर्ड, समता नगर, भंडारा) असे आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ व ६ अन्वये गंभीर गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पवनीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी ज्योतिका इंगळे यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.

शहरात तणावपूर्ण वातावरण
या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी भंडारा शहरात उमटले. सकाळी ११ वाजता गांधी चौक येथे शेकडो नागरिकांनी निदर्शने केली आणि तेथून जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चाने कूच केली. त्रिमूर्ती चौकात या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चात महिला, युवती, विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, आरोपीला फाशी द्या, आम्हाला न्याय पाहिजे, अशा संताप व्यक्त करणाऱ्या घोषणा दिल्या.

शहरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा व चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सावन कुमार यांना भेटून निवेदन सादर केले आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. प्रशासनाने या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून नराधमाला कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन दिले आहे. सर्वपक्षांकडूनही पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

सात दिवसात तपास पूर्ण करु-संदिप पाटील
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी भंडारा येथे भेट देत माहिती जाणून घेतली. या घटनेच्या तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी ज्योतिका इंगळे यांच्या नेतृत्वात ११ जणांची विशेष टीम गठीत करण्यात आली आहे. या घटनेचा तपास येत्या सात दिवसात पूर्ण करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल. मृत्यूदंड आणि आजन्म कारावासाची तरतूद असलेले गुन्हे आरोपीवर लावण्यात आलेले आहेत. विशेष सरकारी वकीलाच्या नियुक्तीसाठी सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. आरोपीला लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न आहे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक संदिप पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT