भंडारा : निजामुद्दीन ते बिलासपूरकडे जाणाऱ्या गोंडवाना एक्सप्रेस गाडीतून कुटुंबासोबत प्रवास करणारा प्रवासी पिण्याच्या पाण्यासाठी खाली उतरला होता. त्या गाडी सुरू झाली आणि चालत्या गाडीत चढताना त्याच्या पाय घसरला. तो गाडी खाली आल्याने त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. ही दुर्दैवी घटना तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.
मृत प्रवाशाचे नाव गोविंद कुमार (४८) राहणार गुडगाव (हरियाणा) असे आहे. गोविंद कुमार आणि त्यांचे कुटुंब दुर्ग येथे पाहूण्यांकडे जात होते. तुमसर रोड रेल्वे स्थानकात प्रवासी गाडी थांबल्यावर गोविंद कुमार पिण्याच्या पाण्याकरिता रेल्वे स्थानकात उतरले. यादरम्यान गाडी सुरू झाली. धावत्या गाडीत चढताना गोविंद कुमार यांचा पाय घसरला. त्यामुळे ते थेट रेल्वे ट्रॅक खाली आले. क्षणात त्यांच्या अंगावरून गाडी गेल्याने त्यांच्या शरीराचे अक्षरशा: दोन तुकडे झाले. त्यात ते जागीच गतप्राण झाले. अपघातानंतर प्रवासी गाडी थांबली. गोविंद कुमार यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. रेल्वे स्थानकात मोठी गर्दी झाली. त्यावेळी इतर रेल्वे प्रवाशांच्या डोळ्यातही अश्रू आले. तुमसर रोड रेल्वे जीआरपीने गुन्हा दाखल केला असून रेल्वे पोलीस निरीक्षक मोगेसुद्दीन पुढील तपास करीत आहेत.