Pudhari
भंडारा

Bhandara Gas Crisis | गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार; संतप्त नागरिकांनी नागपूर-रामटेक महामार्ग रोखला

डिलिव्हरीचा मेसेज येऊनही सिलिंडर मिळेना, प्रखर उन्हात नागरिकांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Ramtek highway block news

भंडारा : भंडारा शहरात गॅस सिलिंडरच्या टंचाईने उग्र रूप धारण केले असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी शनिवारी (दि.१८) खात रोडवरील एचपी गॅस गोदामासमोर नागपूर-रामटेक महामार्ग अडवून धरला.

सिलिंडर मिळत नसल्याने आणि एजन्सीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने संतप्त महिला व पुरुषांनी भररस्त्यात ठिय्या मांडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.

भंडाऱ्या तील गुर्जर एचपी गॅस एजन्सीच्या विरोधात नागरिकांचा मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. अनेक ग्राहकांच्या मोबाईलवर सिलिंडर ‘डिलिव्हर’ झाल्याचे मेसेज येत आहेत, इतकेच नव्हे तर काहींच्या खात्यावर सबसिडीचे पैसेही जमा झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात महिनाभरापासून सिलिंडर मिळाले नसल्याचा गंभीर आरोप ग्राहकांनी केला आहे. ‘मोबाईलवर मेसेज येतो, पण घरातली शेगडी पेटायला गॅस नाही,’ अशा शब्दांत ग्राहकांनी आपला संताप व्यक्त केला.

आंदोलक नागरिकांनी यावेळी केवायसी करण्याच्या नावाखाली ग्राहकांकडून २३४ रुपयांची पावती फाडून पैसे उकळले जात असल्याचे सांगितले. मात्र, तरीही वेळेवर सिलिंडर पुरवठा केला जात नाही. पहाटे ५ वाजेपासून नागरिक रांगेत उभे राहूनही त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवले जात असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. एजन्सीचे मालक किंवा व्यवस्थापक संवाद साधण्यास तयार नसल्याने नागरिकांनी स्वयंस्फूतीर्ने रस्ता रोको आंदोलन केले.

भर उन्हात नागरिकांनी महामार्ग रोखल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांची संख्या आणि त्यांचा संताप पाहता खात रोडवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र ‘आधी सिलिंडर द्या, मगच रस्ता मोकळा करू’अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.

काळ्याबाजाराची शक्यता

उज्ज्वला योजना आणि सरकारकडून नियमित पुरवठ्याचा दावा केला जात असताना, केवळ याच एजन्सीमध्ये तुटवडा का भासतोय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा प्रकार कृत्रिम टंचाई निर्माण करून सिलिंडरचा काळाबाजार करण्यासाठी तर नाही ना, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुरवठा विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी एजन्सीवर कडक कारवाई करावी आणि ग्राहकांना तात्काळ सिलिंडर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT