File Photo 
भंडारा

Bhandara leopard rescue |अड्याळ वनपरिक्षेत्रात कालव्यात अडकलेला बिबट्या ३ तासांच्या प्रयत्नांनंतर जेरबंद

उमरी चौ. येथील गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास; पशुवैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : भंडारा वनविभागातील अड्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या केसलवाडा नियतक्षेत्रातील उमरी चौ. (ईसापूर) गावालगत असलेल्या कालव्याच्या (नहर) पायलीमध्ये आज सोमवार, १८ मे २०२६ रोजी सकाळी एक बिबट्या अडकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. वनविभागाने स्थानिक नागरिक आणि शीघ्र बचाव दलाच्या (आरआरटी) मदतीने सुमारे ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर या बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद केले.

आज सकाळी ५:४५ वाजताच्या सुमारास उमरी चौ. येथील पोलीस पाटील प्रफुल सावरबांधे यांना गावालगतच्या कालव्यात बिबट्या असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने याची कल्पना अड्याळ वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक सचिन बा. निलख आणि वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश आर. शर्मा यांच्यासह वनरक्षक व शीघ्र बचाव दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळावर बिबट्याला पाहण्यासाठी अंदाजे २०० ते ३०० स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. वन्यजीव संघर्षातून कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी वनविभागाने शीघ्र बचाव दलाच्या मदतीने जमावाला तात्काळ नियंत्रित केले आणि नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या.

वनअधिकारी आणि शीघ्र बचाव दलाच्या पथकाने कालव्याच्या पायलीत बसलेल्या बिबट्याचे बारकाईने निरीक्षण केले. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करत पायलीची एक बाजू पूर्णपणे बंद करण्यात आली आणि दुसऱ्या बाजूला लोखंडी पिंजरा लावण्यात आला. काही वेळातच बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि वनविभागाने त्याला सुरक्षितपणे जेरबंद केले.

जेरबंद केलेल्या बिबट्याला पुढील तपासणीसाठी अड्याळ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आणण्यात आले. तिथे अड्याळचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिसलवार यांनी बिबट्याची सविस्तर वैद्यकीय तपासणी केली. हा बिबट्या साधारण दीड ते दोन वर्षांचा वयस्क असून ती 'मादी' आहे. तपासणीअंती ती शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सुदृढ असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने या बिबट्याला पुन्हा सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT