Leopard Attack Pudhari
भंडारा

Bhandara Leopard Attack | बिबट्याचा हल्ला; ११ शेळ्या ठार, ३ जखमी

पुढारी वृत्तसेवा

भंडारा - पवनी तालुक्यातील कोरंभी येथे रविवारी (दि. १४ जून २०२६) पहाटे अंदाजे २.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात घुसून धुमाकूळ घातल्याची घटना घडली. या हल्ल्यात शेतकरी गुरुदास सुदामे यांच्या ११ शेळ्या ठार झाल्या असून ३ शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने रात्रीच्या वेळी सुदामे यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात प्रवेश करून शेळ्यांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी नागदेवे व क्षेत्र सहाय्यक सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीटरक्षक डेव्हिड मेश्राम, बीटरक्षक राजाराम राठोड तसेच आर.आर.टी. (रॅपिड रिस्पॉन्स टीम) च्या सदस्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सदर घटनेचा मौका पंचनामा करण्यात आला.

वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधण्यासह रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यास शासन नियमानुसार भरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.या घटनेमुळे कोरंभी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT