भंडारा : पवनी मार्गावरील नेरला येथील शेतशिवारातील गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात २६ शेळ्या ठार झाल्या. २५ शेळ्या जागेवर ठार करून एक शेळी घेऊन बिबट्या पसार झाला. ही घटना सोमवारी (दि. ४) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
नेरला येथील शामराव लोहारे हे अनेक वर्षांपासून नेरला शेतशिवारात शेतीसह शेतात गोठा बांधून पशुपालनाचा व्यवसाय करतात. सोमवारी पहाटे त्यांनी गोठ्याची पाहणी केली असता काही शेळ्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. यात पशुपालकाचे चार लाखाचे नुकसान झाले. त्यांनी तात्काळ अड्याळ वनविभागाशी संपर्क साधला. पंचनामा केल्यानंतर हा हल्ला बिबट्याने केल्याचे निष्पन्न झाले.
माहितीनुसार, रविवारच्या (दि. ३) सायंकाळी गोठ्यात ३० शेळ्या आणि दोन गायी बंद करून शामराव घरी आले. सोमवारी पहाटे गोठ्यातील शांतता पाहून त्यांनी गोठ्याचा दार उघडताच हा प्रकार लक्षात आला. एकाच वेळी बिबट्याने २६ शेळ्या ठार केल्याची ही घटना पहिल्यांदाच घडल्याने ग्रामस्थ दहशतीत आहेत. घटनास्थळी अड्याळ वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा, दुनेदार, निलेश श्रीरामे, संदीप भुसारी, पशुपालक शामराव लोहारे, ग्राम पंचायत सदस्य दिपक पाल इत्यादी उपस्थित होते.