Lakhani Maregaon Farmer Death  Pudhari
भंडारा

Bhandara Farmer Death | कर्जाच्या विवंचनेत शेतकऱ्याने जीवन संपविले: मुलाच्या डोळ्यादेखत बापाने सोडला जीव

लाखनी तालुक्यातील मरेगाव येथील घटननेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Lakhani Maregaon Farmer Death

भंडारा: गत तीन वर्षापासून धानपीक संकटात असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या ५२ वर्षीय शेतकऱ्याने शेतालगतच्या करंजीच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. ताराचंद रघुनाथ बेंदवार (रा. मरेगाव, ता. लाखनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी (दि. १५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. मुलाच्या डोळ्यादेखत घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बेंदवार यांच्या मालकीची अवघी सव्वा एकर शेती होती. दोन-चार दिवसांत धान कापणीला येणार असतानाच संपूर्ण पीक रोगराईच्या संकटात सापडले. उत्पन्न डुबण्याची पूर्ण भीती तयार झाली. शेतीसाठी घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते, तर खासगी व्यवहारांची उधारीही डोक्यावर होती. दिवाळी तोंडावर असताना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आणि आर्थिक देणी भागविण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. दुष्काळग्रस्त जिल्ह्यात लाखनी तालुक्याचा समावेश नसल्याने समस्या आणखीनच बिकट ठरले. या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

 मुलाला फोन करून शेतावर बोलावले

 घटनेपूर्वी बेंदवार यांनी मोबाईलवरून मुलाला फोन करून शेतावर बोलावले. मुलगा मित्रासह शेतात पोहोचताच त्याच्या डोळ्यांसमोर वडिलांनी शेतालगत रस्त्याच्या कडेला असलेल्या करंजीच्या झाडाला गळफास घेतला. मुलाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला. घटनेची माहिती मिळताच पालांदूरचे ठाणेदार विलास मुंढे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विलास मुंढे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT