Jio Tower Cable Cut Bhandara
भंडारा: रिलायंस जिओ कंपनीकडे पगारवाढीची मागणी केली. संपही केला. परंतु, कंपनीने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील केबलच कापली. त्यामुळे तब्बल २५८ तास नेटवर्क खंडित राहिला. त्यातून कंपनीचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
याप्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मनोज राजेंद्र पाटील ( वय ३०, रा. भंडारा) आणि राकेश धांडे (रा. सावरी, लाखनी) अशी दोन रिलायंस जिओ कंपनीच्या कर्मचा ऱ्यांची नावे आहेत.
मनोज आणि राकेश हे रिलायंस जिओ कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कामाला आहेत. काही दिवसांपासून त्यांनी कंपनीकडे पगारवाढीची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने दोन्ही कर्मचारी संपावर गेले आहेत. तरीही कंपनीकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांनी कंपनीच्या नेटवर्कच्या कामात हस्तक्षेप निर्माण केला.
९ फेब्रवारी रोजी दोघांनी रिलायंस जिओ कंपनी मोबाईल टॉवरवरील फायबर केबल कापली. त्यामुळे ५४ टॉवरवरील नेटवर्क सेवा २५८ तासांसाठी खंडित झाली. त्यात कंपनीचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. सोबतच जिओ कंपनीच्या मोबाईलधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. याप्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यां विरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.