Wild Animal Attack Ai Photo
भंडारा

Wild Animal Attack Bhandara | धान कापणीच्या हंगामात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र; दोन तरुणांसह पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

१४ दिवसांत तिघांचा बळी: बाह्मणी आणि दोनाड येथील घटनांमध्ये आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या मुलांवर वन्यप्राण्यांचा हल्ला

पुढारी वृत्तसेवा

Human Wildlife Conflict Bhandara

भंडारा : धान कापणीचा हंगाम सुरू असतानाच शेतशिवारात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. २६ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या अवघ्या १४ दिवसांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत तिघांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये दोन तरुण आणि एका पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, बाह्मणी आणि दोनाड येथील घटनांमध्ये आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या मुलांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केला. त्यामुळे शेतशिवारातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका बाजूला उभे पीक कापण्याची आणि कापलेले धान घरात आणण्याची लगबग, तर दुसरीकडे शेतात दबा धरून बसलेल्या वन्यप्राण्यांची दहशत, अशा दुहेरी संकटात शेतकरी आणि शेतमजूर सापडले आहेत.

या घटनांची सुरुवात २६ ऑक्टोबरच्या रात्री झाली. उमरेड-कºहांडला वन्यजीव अभयारण्याच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या बासोरा-बोरगाव-वेलतूर कालवा मार्गावर वाघाच्या हल्ल्यात २८ वर्षीय अमित भीमराव राऊत याचा मृत्यू झाला. बासोरा येथील रहिवासी असलेला अमित अन्य चार मजुरांसह वेलतूर येथे सेंट्रिंगचे काम आटोपून दोन दुचाकींनी गावाकडे परतत होता. त्यावेळी वाघाने केलेल्या हल्ल्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अवघ्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या अमितच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार हिरावला.

दुसरी घटना ५ नोव्हेंबरला लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे घडली. वैनगंगा नदीच्या घाट परिसरातील शेतात कापलेले धान गोळा करण्यासाठी पाच वर्षीय मोक्ष सचिन बुरडे आई-वडिलांसोबत गेला होता. कुटुंबीय धान गोळा करण्यात व्यस्त असताना जवळच असलेल्या मोक्षवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. त्याला जबड्यात पकडून बिबट्याने सुमारे ३०० मीटरपर्यंत फरफटत नेले. आई-वडील आणि नातेवाइकांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने बालकाला शेतात सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र, गंभीर जखमी झालेल्या मोक्षचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गाव हादरले.

तिसरी घटना ८ नोव्हेंबरला साकोली तालुक्यातील बाह्मणी येथे घडली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आई-वडिलांसोबत धान कापणीसाठी शेतात गेलेल्या २७ वर्षीय कुणाल कैलास उईके याच्यावर वाघाने मागून अचानक हल्ला केला. आई-वडील जवळच दुसºया बांधीत कापणी करीत असताना कुणाल स्वतंत्र बांधीत काम करीत होता. वाघाने त्याला फरफटत सुमारे २०० ते ३०० फूट अंतरावर नेले. गावकºयांनी लाठ्याकाठ्या आणि काटेरी फांद्यांच्या मदतीने आरडाओरड करून वाघाला पिटाळले. कुणालची सुटका करण्यात आली; मात्र तो गंभीर जखमी झाला होता. लाखनी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर भंडाºयाला हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दिवाळीच्या सणात घडलेल्या या घटनेने उईके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

शेती करायची की जीव वाचवायचा?

धान कापणी, कापलेले पीक गोळा करणे, मळणी आणि वाहतूक या कामांसाठी शेतकरी व मजुरांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राहावे लागते. अनेक ठिकाणी कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे शेतीची कामे करतात. काही वेळा लहान मुलांनाही सोबत नेले जाते. अशा परिस्थितीत झुडपांमध्ये दबा धरून बसलेला वन्यप्राणी अचानक हल्ला करतो आणि सावध होण्याची संधीही मिळत नाही, हे दोनाड आणि बाह्मणी येथील घटनांनी स्पष्ट केले आहे. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीची कामे थांबविणे शक्य नाही. धान कापणीला विलंब झाल्यास उत्पादनाचे नुकसान होण्याची भीती आहे. मात्र, शेतात जाणेही जीवावर बेतू लागल्याने शेतकऱ्यां समोर मोठे संकट उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT