भंडारा : भंडारा जिल्ह्यात मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत डिसेंबर २०२५ ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तब्बल ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या बालकाचाही समावेश असल्याने या घटनांचे गांभीर्य अधिक वाढले आहे. वाघाच्या हल्ल्यात सहा, बिबट्याच्या हल्ल्यात तीन, तर अस्वल आणि रानडुकराच्या हल्ल्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी वनविभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत दोन बिबटे आणि एका वाघाला जेरबंद करून अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. याशिवाय काही वन्यप्राण्यांच्या स्थलांतराची प्रक्रियाही सुरू आहे. मात्र, वनविभागाच्या या उपाययोजनांनंतरही ग्रामीण भागातील नागरिकांमधील भीती कमी झालेली नाही. जंगलात जाणाऱ्या नागरिकांपुरता मर्यादित असलेला वन्यप्राण्यांचा धोका आता थेट गाववस्त्यांपर्यंत आणि घरांच्या परिसरापर्यंत पोहोचल्याने चिंतेत भर पडली आहे.
भंडारा जिल्ह्याचा मोठा भूभाग नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पवनी-करांडला अभयारण्याच्या प्रभावक्षेत्रात येतो. जिल्ह्यातील सुमारे चार तालुके अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराशी जोडलेले आहेत. जिल्ह्यातील समृद्ध वनसंपदा आणि मुबलक जलसंपत्तीमुळे वन्यजीवांना पोषक अधिवास उपलब्ध झाला आहे. परिणामी, स्थानिक वन्यप्राण्यांसोबतच भ्रमंतीसाठी येणाऱ्या वाघ, बिबटे आणि अन्य वन्यजीवांचाही वावर वाढत आहे.
तुमसर तालुक्यात घनदाट जंगलाचे प्रमाण अधिक असल्याने तेथील नागरिकांना वन्यप्राण्यांच्या वावराची तुलनेने अधिक सवय झाली आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना अन्य भागांच्या तुलनेत कमी असल्याचे चित्र आहे. मात्र, भंडारा, पवनी, लाखांदूर आणि साकोली तालुक्यांमध्ये संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी जंगलात जनावरे चारण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांनाच वन्यप्राण्यांचा अधिक धोका होता. आता मात्र वन्यप्राण्यांचा वावर थेट गावांमध्ये आणि घरांच्या परिसरात वाढल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभागाकडून संबंधित परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर हल्लेखोर वन्यप्राण्याला पकडून अन्यत्र स्थलांतरित करण्याची कार्यवाही केली जाते. मात्र, एखाद्या वन्यप्राण्याला स्थलांतरित केल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांत त्याच परिसरात दुसऱ्या वन्यप्राण्याचा वावर सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वन्यप्राणी माणसासाठी धोकादायक नसला, तरी एका प्राण्याचे स्थलांतर केल्यानंतर त्याच परिसरात दुसऱ्या प्राण्याचा वावर सुरू होत असल्याने किती वन्यप्राण्यांचे स्थलांतर करायचे, असा प्रश्न वनविभागासमोर उभा राहिला आहे.
वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरणे, नागरिकांवर हल्ला करणे किंवा एखाद्या परिसरात वन्यजीव दिसून येणे अशा घटनांमध्ये तातडीने मदत पोहोचविण्यासाठी वनविभागाने यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. यापूर्वी संपूर्ण जिल्ह्यासाठी केवळ एकच जिल्हास्तरीय रॅपिड रेस्क्यू टीम (आरआरटी) कार्यरत होती. जिल्ह्याच्या विविध भागांत पोहोचण्यासाठी या पथकाला सुमारे ४५ मिनिटांचा कालावधी लागत होता. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्याचे आव्हान निर्माण होत होते.
आता जिल्ह्यातील सर्व १० वनपरिक्षेत्रांसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात पाच सदस्यांचा समावेश असून, अशा एकूण दहा रॅपिड रेस्क्यू टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासोबतच आपत्कालीन घटनांमध्ये घटनास्थळी तातडीने पोहोचणे शक्य होणार आहे.
वन्यजीवांच्या वाढत्या हालचाली आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाकडून तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे. वन्यप्राण्यांच्या हालचालींवर अधिक अचूकपणे लक्ष ठेवता यावे, यासाठी शासनाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कार्यप्रणाली उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर जंगलालगतच्या गावांमध्ये नागरिकांना सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जनजागृतीवरही भर दिला जात आहे.
— सचिन निलख, सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक), भंडारा