भंडारा : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य व्यवस्थेबाबत धक्कादायक बाब समोर आल्याचा दावा खासदार प्रशांत पडोळे यांनी केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांच्या अचूक निदानासाठी महत्त्वाची असलेली एमआरआय तपासणीची मशीन बंद असल्याचे पाहणीत आढळून आल्याने रुग्णसेवेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणेची शासनाकडील थकबाकी प्रलंबित असल्याने मशीन बंद ठेवण्यात आल्याचे सूचित करणारी सूचना मशीनसमोर लावण्यात आल्याचे खासदार पडोळे यांनी सांगितले.
एमआरआय मशीन बंद
खासदार प्रशांत पडोळे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली असता एमआरआय मशीन बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मशीनसमोर लावण्यात आलेल्या सूचनेमध्ये संबंधित यंत्रणेची शासनाकडील थकबाकी अद्याप प्राप्त न झाल्याने सेवा बंद असल्याचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य सेवेतील अत्याधुनिक तपासणी सुविधा बंद राहणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. विशेषत: शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाºया सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये महागड्या तपासण्या करून घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणा बंद राहिल्यास त्याचा थेट परिणाम आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर होण्याची शक्यता आहे.
गंभीर रुग्णांच्या उपचारात निदानाला विलंब होणे आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक ठरू शकते. त्यामुळे अशा अत्यावश्यक तपासणीची सुविधा कोणत्याही प्रशासकीय किंवा आर्थिक कारणामुळे दीर्घकाळ बंद राहू नये, अशी अपेक्षा रुग्ण आणि नातेवाइकांकडून व्यक्त होत आहे.
थकबाकीचा प्रश्न तातडीने मार्गी लावा
एमआरआय मशीन बंद असल्याच्या मुद्द्यावरून खासदार प्रशांत पडोळे यांनी राज्य सरकारला जाब विचारला आहे. शासनाकडून संबंधित यंत्रणेची थकबाकी देणे बाकी असल्यास त्याची शिक्षा रुग्णांना का भोगावी लागावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असून, तिच्या सातत्यपूर्ण उपलब्धतेला सर्वोच्च प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. शासन आणि संबंधित सेवा पुरवठादार यांच्यातील आर्थिक व्यवहारांचा परिणाम रुग्णांच्या तपासणी आणि उपचारांवर होणे योग्य नाही, अशी भूमिका खासदारांनी मांडली. तसेच भविष्यात आर्थिक कारणांमुळे अत्यावश्यक वैद्यकीय सेवा खंडित होणार नाहीत, यासाठी ठोस व्यवस्था करावी, अशी मागणी पुढे येत आहे.