भंडारा : जिल्ह्यात गुरुवारी (दि. २३) देखील पावसाचा जोर कायम राहिला असून, सर्व सातही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या सोमवारपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून, जिल्ह्यात सध्या ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांच्या पाण्याच्या पातळीय वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कारधा येथे वैनगंगा नदीची पाणीपातळी २४३.९० मीटर इतकी नोंदवली गेली आहे. पाण्याची आवक वाढल्यामुळे गोसेखुर्द धरण प्रकल्पाचे १५ दरवाजे अर्धा मीटरपर्यंत उघडून १८३१.९६ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोसेखुर्द धरण ५८.०५ टक्के भरले आहे. त्याचप्रमाणे बावनथडी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातही सुधारणा झाली. एका आठवड्यापूर्वी अवघा पंधरा टक्के असलेला पाणीसाठी आता २१.५० टक्क्यांवर पोहोचला आहे.
या सर्वदूर झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील शेतीकामांना मोठा वेग मिळाला आहे. शेतकरी वर्गाकडून धान रोवणीची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. पावसाने आगामी काळात अशीच साथ दिल्यास चालू हंगामात उत्तम उत्पन्नाची शक्यता आहे. जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण पावसाची सरासरी सुधारली असून, आतापर्यंत ३१६.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी अपेक्षित प्रमाणाच्या ८० टक्क्यांहून अधिक आहे. सोमवारपासून पाऊस उसंत घेण्याची शक्यता असून, या कालावधीत हवामान सामान्य असेल तर ऊन पडण्याचा अंदाज आहे.