भंडारा : भंडारा जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच आणि सदस्य पदांसाठी मंगळवारी पार पडलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल बुधवारी घोषित करण्यात आले. प्रत्यक्ष राजकीय पक्षांच्या चिन्हावर ही निवडणूक नसली तरी, स्थानिक स्तरावर राजकीय पक्षांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले आहेत. तप्त उन्हातही मतदारांनी या निवडणुकीत मोठा उत्साह दाखवला होता.
निवडणुकीचे निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी ढोलताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. अनेक ठिकाणी विजयाची घोषणा होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दुसरीकडे पराभूत उमेदवारांच्या गोटात निराशेचे वातावरण पसरले होते. जिल्हयातील ५२ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया शांततेत पार पडली असून प्रशासनाने मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार आता नव्या दमाने सुरू होणार असून, निवडून आलेल्या प्रतिनिधींकडून विकासाच्या नव्या अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
१३ गावांत सरपंच पदासाठी चुरस
जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींमधील ५३ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. त्यापैकी २१ जागांवर अविरोध निवड झाल्याने प्रत्यक्षात ५३ जागांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये ८७ उमेदवार रिंगणात होते. विशेषत: १३ गावांमध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणूक झाल्याने तेथे राजकीय वातावरण अधिकच तापलेले पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होताच निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अड्याळ आणि परसोडीत प्रतिष्ठेची लढत
अड्याळ येथे चार रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली. येथे सरपंच शिवशंकर मुंगाटे आणि उपसरपंच शंकर मानापुरे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. परसोडी येथे थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने या जागेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राजेदहेगाव येथे दोन सदस्य पदांसाठी निवडणूक होती, त्यापैकी एका जागेवर अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून बिनविरोध निवड करण्यात आली.