भंडारा रुग्णालयाचा 'भोंगळ' कारभार! रुग्णांना दिलं जातयं निकृष्ट दर्जाचे अन्न 
भंडारा

Bhandara News : भंडारा रुग्णालयाचा 'भोंगळ' कारभार! रुग्णांना दिलं जातयं निकृष्ट दर्जाचे अन्न

शासकीय नियमांची पायमल्ली; खासदारांच्या धाडीने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी शुक्रवारी (दि.२०) रुग्णालयाला अचानक भेट देऊन भोजन कक्षाची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.

पाहणीदरम्यान भोजन कक्षात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व दुर्गंधी आढळून आली. रुग्णांना पुरविले जाणारे अन्न अत्यंत निकृष्ट, अस्वच्छ आणि काही ठिकाणी कच्चे असल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच स्वयंपाकगृहात व्यावसायिक गॅस सिलिंडरऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करण्यात येत असल्याचेही आढळून आले. ही बाब अत्यंत धोकादायक असून शासनाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन करणारी आहे.या प्रकारामुळे रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असून ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी नमूद केले. शासनाच्या ठरवून दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविणे, हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा कडक इशाराही त्यांनी दिला.

यासंदर्भात अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा यांना सविस्तर पत्र देऊन तात्काळ सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी कंत्राटदारावर कठोर कार्यवाही करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंत्राटदाराची सर्व बिले तत्काळ थांबविण्यात यावीत. तसेच प्राथमिक स्वरूपात कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय या संपूर्ण प्रकरणासंदर्भात झालेल्या चौकशीचा सविस्तर अहवाल ८ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे रुग्णालयातील भोजन व्यवस्थेतील हलगर्जीपणावर चांगलाच प्रकाश पडला असून प्रशासन आता काय ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये खासदारांच्या या तत्पर भूमिकेमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT