भंडारा: पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडकडीत विरोध केला आहे. यासंदर्भात आज (दि. १६) शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
लाखांदूर तालुक्यातून भंडारा ते गडचिरोली द्रुतगती महामार्ग जात असून संबंधित विभागाच्या वतीने जमीन हस्तांतरीत करण्यासाठी कारवाई सुरू केली. मात्र, सदर रस्त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यापूर्वी शेतजमिनीची किंमत किती मिळणार? हे अद्यापही शेतकऱ्यांना कळविण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमित आहेत. शिवाय शासनाने बळजबरीने शेतीची मोजणी करणे सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
१६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी शेती मोजणीकरीता शेतावर हजर राहावे, अन्यथा पुनर्मोजणीचे पैसे शेतकऱ्यांकडून वसूल केल्या जाईल, असे पत्र देण्यात आल्याने शेतकरी संतापले आहेत.
लाखांदूर तालुक्यात सिंचनाची सोय असून येथील शेती बारमाही पिकाची आहे. समृद्धी महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे. एक रुपयाचा मोबदला न देता उलट शासन दडपशाही करीत असल्याने तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन आम्हा शेतकऱ्यांशी चर्चा करावी व भेटीसाठी वेळ द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
तहसीलदार वैभव पवार यांनी संतप्त शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद ढोरे, उपाध्यक्ष प्रभू मेंढे, सचिव रमेश राऊत, कोषाध्यक्ष स्वप्नील ठेंगरी, तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.