Bhandara Mohadi Taluka Farmer Dies Lightning
भंडारा : जिल्ह्यात सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे मोहाडी तालुक्यातील बेटाळा गावातील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मेघगर्जनेसह पाऊस पडत असताना शेतात काम करत असलेल्या या शेतकऱ्यावर वीज कोसळली. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. रामकृष्ण तुकडू देशमुख (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सोमवारी दुपारी हवामानात अचानक बदल झाला आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मोबाईलवर वीज पडण्याबाबतचा इशारा (अलर्ट) देण्यात आला आणि मेघगर्जना सुरू झाली. खरीप हंगाम सुरू असल्याने जिल्ह्यातील शेतकरी आपापल्या शेतात काम करत होते. रामकृष्ण तुकडू देशमुख हे देखील आपल्या शेतात भाताची रोपे लावत असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांनी तालुका प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पटवारी आणि तहसीलदार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या या शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
सहा शेतकऱ्यांचा बळी
या वर्षी आतापर्यंत (सोमवारपर्यंत) जिल्ह्यात वीज पडून एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हवामानात बदल होताच प्रशासनाकडून मोबाईलवर सूचना (अलर्ट) पाठवल्या जात असल्या, तरी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांकडे अनेकदा मोबाईल नसतात; त्यामुळे त्यांना आवश्यक ती खबरदारी घेता येत नाही.