भंडारा - बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवा लाटणाऱ्या महसूल विभागातील सात अधिकाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. यामध्ये तीन अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून तिघांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच एका नायब तहसीलदाराला बडतर्फ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
अपंगत्व नसताना किंवा अपंगत्वाचे प्रमाण जास्त दाखवून बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची विशेष समितीमार्फत चौकशी करण्यात आली. नागपूर येथील वैद्यकीय मंडळाने महसूल विभागातील २२ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पुनर्तपासणी केली. या तपासणीत ७ अधिकाºयांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाले. शासनाची दिशाभूल करून नोकरी मिळवल्याचा ठपका ठेवत जिल्हा निवड समितीने ही कारवाई केली आहे.
बडतर्फ करण्यात आलेले अधिकारी वसुंधरा वासनिक (इंगळे), मंडळ अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा (पुनर्वसन शाखा), शारदा सूर्यभान झंझाड, तलाठी, मोहाडी, विनोद भावे, तलाठी, मोहाडी यांचा समावेश आहे.
निलंबित करण्यात आलेले अधिकारी
शिवशंकर साखरवाडे, सहाय्यक महसूल अधिकारी, योगराज बाबुराव डांबरे, तलाठी- लाखनी, दिलीपसिंग भरतसिंग ठाकूर, सहाय्यक महसूल अधिकारी, पवनी यांना निलंबित करण्यात आले आहे.
नायब तहसीलदारांवर कारवाईची तयारी
भंडारा येथील नायब तहसीलदार आनंद हट्टेवार यांना बडतर्फ करण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हा निवड समितीने शासनाकडे पाठवला असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली आहे.