भंडारा: आंबागड किल्ला पाहून कालव्यामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज ३१ जानेवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली.
जागेश्वर यशवंत वाढीवे (२८), दीपक अरविंद वाढीवे (२९) रा. रामपुरी ता. लाखनी असे मृतकांची नाव असून ते आपल्या नातेवाईकांकडे आल्याची माहिती आहे.
लाखनी तालुक्यातील रामपुरी येथील वाढीवे कुटुंबातील जागेश्वर आणि दीपक हे दोघे आपल्या नातेवाईकाकडे आले होते. जवळच असलेला आंबागड किल्ला पाहून ते बावनथडी कालव्यामध्ये आंघोळीसाठी गेले. वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पाण्याच्या अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
गावातील काही नागरिकांना कालव्याजवळ चप्पल आणि कपडे आढळल्याने संशय व्यक्त केला. सदर घटना आंबागड येथील पोलिस पाटलांना सांगण्यात आली. त्यानंतर आंधळगाव पोलिस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली असता दोन मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळले. घटनास्थळी गावकºयांनी एकच गर्दी केली होती. शर्टाच्या खिशात असलेल्या कागदामुळे दोघांची ओळख पटली.