भंडारा: शहरात शनिवारी (दि.९) रात्री मुस्लीम लायब्ररी चौकाजवळील मिस्कीन टँक गार्डन रोडवर दोन तरुणांची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
दुहेरी हत्याकांडामध्ये टिंकू उर्फ वसीम खान (३५) आणि शशांक गजभिये (२३), दोघेही रा.भंडारा अशी खून झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी (दि.९) रात्री टिंकू खान आपल्या दुकानात काम करत असताना, शशांक गजभिये त्याच्या जवळ होता. अचानक तीन-चार अज्ञात हल्लेखोरांनी दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. टिंकू खानवर अनेक वार झाले, तर शशांक गजभियेने बचावासाठी धाव घेतली असता त्याच्यावरही जोरदार हल्ला करण्यात आला. दोघेही गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवरून तपास सुरू केला आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
स्थानिक सूत्रांनुसार, टिंकू खान आणि हल्लेखोरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. याच वादातून ही दुहेरी हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व शक्य कोनातून तपास सुरू आहे. या घटनेमुळे भंडारा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालय परिसरातही मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे तिथेही पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. शहरातील नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.